वासनाधीन सासऱ्याचा सुनेवरच बलात्काराचा प्रयत्न, सोडवायला गेलेली सासू मारहाणीत जखमी

Foto

औरंगाबाद- कामावरून घरी येण्यास वेळ झाल्याच्या कारणावरून सुनेवर संशय घेत ५० वर्षीय सासर्‍यानेच सुनेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यास प्रतिकार करण्यासाठी आलेल्या आपल्या पत्नीलादेखील आरोपीने मारहाण करून जखमी केले. हा संतापजनक प्रकार शनिवारी(ता.२) रात्री वानखेडेनगर भागात घडला. पोलिसांनी आरोपी सासर्‍याला अटक केली आहे.

 

शहरातील वानखेडेनगर भागात राहणारी २५  वर्षीय विवाहिता ही खाजगी ठिकाणी कामाला आहे. शनिवारी कामावरून येण्यास तिला उशीर झाला. त्यावेळी घरात सासू दुसर्‍या खोलीत घरकाम करीत होत्या, तर सासरा हॉलमध्ये बसलेला होता.सून घरात येताच सासर्‍याने उशीर का झाला, असे विचारत लगट करण्यास सुरुवात केली. काही कळण्याच्या आत त्याने सुनेचा हात धरून मिठी मारली व अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. सुनेने आरडाओरड केली असता तिची सासू धावून आली व तिने सुनेला पतीच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नराधमाने आपल्या पत्नीलादेखील मारहाण केली. या मारहाणीत त्या जखमी झाल्या.

 

दरम्यान, दोघी सासू-सुनेने स्वत:ची सुटका करीत पळ काढला व थेट पोलिस ठाणे गाठत घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. विवाहितेच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सासर्‍याला अटक केली असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आव्हाड हे करीत आहेत.